उस्मानाबाद / प्रतिनिधी-

परंडा तालुक्यातील सिना काेळेगाव तलावात मासेमारी करण्यासाठी पास-परवान्याच्या मागणीसाठी केले जाणारे मच्छीमारांचे आंदोलन पोलिसांनी अक्षरश: चिरडून टाकले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगून  आंदोलकांना अक्षरश: वाहनांमध्ये कोंबून नेण्यात आले. इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली तरीही मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक अायुक्त आलेच नाहीत. यावेळी आनंदनगर पोलिस ठाण्याचे पीआय दराडे यांनी मात्र लाठीमार केला नसल्याचे सांगितले. 

मासेमारीसाठी परवानगी मागण्यासाठी शुक्रवारी (दि. ३) दुपारी १२ वाजेपासून मच्छीमार ठिय्या मारून बसले होते. सहायक आयुक्तांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी सुरुवातीला त्यांच्या खुर्चीला माशांचा हार घातला. नंतर अर्धनग्न होऊन आंदोलन केले. तरीही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आंदोलक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर चढले. रात्री एकाने विष पिले तर एका महिलेने इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला तरीही सहायक आयुक्त न आल्यामुळे आंदोलकांनी संपूर्ण रात्र इमारतीच्या छतावर काढली. त्यानंतर शनिवारी सकाळी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून ७० जणांनी रक्तदान करण्याचे ठरवले. शिबिराला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत आंदोलन चिरडून टाकले.

 
Top