उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

साेलापूर-हैदराबाद महामार्गावरील फुलवाडी टोलनाक्यावरील बेकायदेशीर टोलवसूली थांबवा, अशी मागणी अणदूर व परिसरातील गावच्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून केली. अन्यथा अांदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फुलवाडी (ता.तुळजापूर) येथे राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझा उभारून टोल वसुलीचे टेंडर एसटीआयपीएल या कंपनीला दिले. या टोलपासून उमरगापर्यंतचे रस्त्याचे, बायपास व उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही. तरीही टोल वसुली सुरू आहे. या टोलपासून दोन्ही बाजूला १० किमीपर्यंत टोल वसुली करता येत नाही. या संदर्भातील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे (एनएचएआय) राजपत्र क्लॉझ २७.८ असून देखील सर्वसामान्य नागरिकांकडून अवैध व राजरोस टोल वसूली करण्यात येत आहे. अणदूर ही परिसरातील मुख्य व मोठी बाजारपेठ असून मोठा आठवडी बाजार देखील याठिकाणी भरतो. त्यानिमित्ताने येथील व परिसरातील सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांना रोज १० किमीच्या अंतरामध्ये फिरावे लागते. त्यामुळे या टोलचा सर्वांना त्रास होत आहे. ग्रामपंचायत सदस्य मासिक बैठकीमध्ये गावातील कोणत्याही वाहनांकडून टोल वसूली करण्यात येऊ नये व उर्वरित काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. या संदर्भात ठराव पारीत करण्यात आला आहे. परंतू कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही उलट व टोल कर्मचाऱ्यांकडून उर्मट व आरेरावीची वागणूक देण्यात आली.१५ दिवसांत योग्य ती कार्यवाही करावी व निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

 
Top