उस्मानाबाद / प्रतिनिधी-

टेंभूर्णी-लातूर महामार्गावरील उस्मानाबाद जिल्हा हद्दीतील पळसप पाटी ते येडशी दरम्यानचे रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सोलापूर व लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता तसेच उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बुधवारी (दि.22) दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, टेंभूर्णी-लातूर महामार्गावरील उस्मानाबाद जिल्हा हद्दीतील पळसप पाटी ते येडशी दरम्यानचे रस्त्याचे काम हॉटमिक्सींगद्वारे 8 महिन्यापूर्वी करण्यात आले. परंतू त्या मार्गावरील साईड पट्टया, सेंटर लाईन मार्कींग व अन्य कामे करण्यात आली नव्हवी. ती अर्धवट कामे पुर्ण करावीत व सोबतच 8 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावर सतत छोट्या मोठ्या अपघातात अनेकजण जायबंद होत आहेत. रात्रीच्या वेळी दुधगाव ते येडशी दरम्यान रस्त्यावरील खड्ड्याचा फायदा घेत या रस्त्यावरुन जाणार्‍या प्रवाशांची लुटमार होत आहे. तसेच हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे प्रलंबित काम व पडलेल्या खड्ड्यांची कामे तात्काळ करावीत, अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची स्वाक्षरी आहे.

 
Top