तुळजापूर / प्रतिनिधी-

  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्याच्या आरोपावरून तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांना तुळजापूर तालुका कोर्टाने 26 सप्टेंबर पर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुरातन नाणे कुठे आहेत व या प्रकरणात आणखी सूत्रधार कोण हे शोधण्यासाठी ही पोलीस कोठडी देण्यात आली , या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख करीत असुन त्या व सहायक पोलिस निरीक्षक शरद रोडगे हे स्वतः न्यायालयात हजर राहिले. पुरातन नाणे प्रकरणात त्या वेळी पदभार असलेल्या इतर अधिकारी यांची चौकशी व जबाब होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती त्यावर न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली.दिलीप नाईकवाडी नंतर या संबंधित आणखी कुणाकुणाला ताब्यात घेतले जाणार व केव्हा घेतले जाणार याकडे भाविकांचे लक्ष  लागले आहे.

  या प्रकरणाची अधिक माहीती अशी की, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी  चौकशी समिती नेमली होती, त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर 2020 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

देवीच्या खजिन्यातील तब्बल 71 प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब 

तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांत नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चरणी अर्पण केली होती. या नाण्यांची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये 1980 पर्यंत होती मात्र 2005 व 2018 मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन 71 नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. किशोर गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात 71 पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते, अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होतील.


 
Top