उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित लोक न्यायालयांमध्ये सर्व मिळून ८ कोटी ८४ हजार १६८ रुपयांची तडजोड झाली. मोटार अपघात प्रकरणात ऑन द स्पॉट धनादेशाचे वितरण झाले. यात एकूण १३ हजार ४९८ प्रकरणांपैकी १६६६ प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात लोकन्यायालय घेण्यात आले. त्यात ई-लोकअदालतीचाही समावेश केला. उस्मानाबाद मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेरलेकर, एन. एच. मखरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद पाटील, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, विधिज्ञ मंडळ अध्यक्ष नितीन भोसले, प्राधिकरणाचे सचिव व्ही. एस. यादव उपस्थित होते. यामध्ये मोटार अपघात, कामगार नुकसान भरपाई प्रकरणातील पक्षकारांना ६ कोटी ९१ लाख ९३ हजार ३०० रुपये नुकसान भरपाईची तडजोड झाली. धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला ४५ लाख ६२ हजार ५४१ रुपयांची वसुली दिली. भू-संपादन प्रकरणात २९ लाख १२ हजार ९४० रुपयांची तडजोड झाली. दावा पूर्व प्रकरणात १ कोटी १५ लाख १५ हजार ३८७ रुपये रकमेची तडजोड झाली.


 
Top