परंडा / प्रतिनिधी-

तालुक्यातील वाटेफळ शिवारात हरीण, ससे आदी वन्यजीवाची शिकार करणारी टोळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी (दि. ६) अंबी पोलिस पथकाने जेरबंद केली.

वाटेफळ शिवारात चार पुरुष पोत्यात माल भरुन फिरत असल्याच्या माहितीवरुन अंबीचे एपीआय आशिष खांडेकर यांच्या पथकातील पोलिस नाईक सिध्देश्वर शिंदे, हवालदार गायकवाड, सोनटक्के यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ६) सकाळी ६.३० छापा टाकून रत्नापूर (ता. परंडा) येथील उमेश व प्रभास नभीलाल काळे, सुजल गहिनीनाथ काळे, हंगेवाडी (ता. भूम) येथील लखन पंच्याहत्तर काळे यांना ताब्यात घेतले. पोत्यांत १० मृत ससे, १ मृत हरीण, १ मृत पक्षी, शिकारीचे फासे, २ टॉर्च असे साहित्य सापडले. पोलिसांनी वन्यजीव व शिकारीचे साहित्य जप्त करुन चौघांना वन परिमंडळ अधिकारी, परंडा यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अनाळा येथील वनरक्षक योगेश रामचंद्र घोडके यांनी दिलेल्या माहिती वरुन चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासवन परिमंडळ अधिकारी चांगदेव कारगळ हे करत आहेत. 

 
Top