मुरुम/ प्रतिनिधी

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने व श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी यांच्या सहकार्याने नवोदित कवींसाठी काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद हे होते. श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दामोदर पतंगे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. 

प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या कार्य गौरवार्थ श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मंचावर मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय पदाधिकारी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, सदस्य डॉ. रामचंद्र काळूंखे, श्रीकृष्ण संस्थेचे उपाध्यक्ष हिरवे, मसाप उमरगा अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, मुख्याध्यापक शिवानंद बुद्ध हे होते. प्रास्ताविक प्रा. किरण सगर यांनी केले.  सुत्रसंचालन सरिता उपासे तर आभार डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी मानले. 

या कार्यशाळेत कर्नाटकातील घाटबोराळ, आळंद, हुमनाबाद, बीदर आदी सीमावर्ती भागातील अनेक कवी सहभागी झाले होते. तसेच उदगीर, जळकोट, उमरगा, लोहारा, अहमदपूर, लातूर, निलंगा, औसा, नळदुर्ग, मुरुम, तुरोरी, कदेर आदी गावचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामीण परिसरातील या कवींना अशामार्गदर्शनाच्या संधी फार क्वचित लाभतात म्हणूनही या कार्यशाळेचे महत्व अधोरेखित होते.

या कार्यशाळेत कवींना निर्मितीप्रक्रियेबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.निर्मितीप्रक्रियेत संवेदनेचे काय महत्व असते. याबाबत  ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांनी अत्यंत मार्मिक  विवेचन केले.

सामान्य संवेदना आणि काव्यात्म संवेदनेतील फरक उलगडून दाखवत मराठी कविता परंपरेतील विशुद्ध संवेदनेचा अविष्कार करणाऱ्या बालकवी, इंदिरा संत, द.भा.धामणस्कर,वसंत डहाके यांच्या कवितेचे दाखले देत प्रासादिक शैलीत विषय मांडणी केली. कवी श्रीधर नांदेडकर यांनी सहभागी कवींना कवितापूर्व  भावस्थिती याविषयी आपले अनुभव सांगत

भारतीय साहित्यातील ज्येष्ठ कवी गजानन माधव मुक्तिबोध यांचा निर्मिती विचार संक्षेपाने परंतु सहजतेने

उलगडून दाखवला व त्याचे आपल्या काव्यानुभूतीशी असलेले नाते प्रत्ययकारी रितीने श्रोत्यांसमोर मांडले.

त्यांच्या भावपूर्ण मांडणीने सभागृहात चैतन्य निर्माण झाले होते. कवीने हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असे सांगणे म्हणजे कवीच्या अंतर्गत जगात ढवळाढवळ करणे असते, असे करणे म्हणजे कवीचे विशुद्ध अंतर्जगत गढूळ करणे असते. त्यामुळे कवीला अभिव्यक्त  होताना कुठलाही दबाव येणार नाही, प्रभावाचा अडसर होणार नाही. याची जबाबदारी ज्येष्ठ कवींनी घ्यावी, असेही नांदेडकर शेवटी म्हणाले. या सत्राचा

अध्यक्षीय समारोप करताना कविवर्य श्रीकांत देशमुख यांनी कलावंताची स्वत्व आणि सत्व जतन करण्याची जबाबदारी किती मोलाची आहे याबाबत सविस्तर विचार मांडले. आपल्या पूर्वसुरींचे साहित्य अभ्यासत

आपली काव्ययात्रा कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवत कवीने आपली ठाम भूमिका अभिव्यक्त करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कविता लेखना दरम्यानची अवस्था हा विषय मांडताना प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी सांगितले की, आपण गोदावरीचं तुडुंब भरलेलं पात्र पाहिलेलं असतं तरी त्र्यंबकच्या डोंगरातील गोदावरीचा छोटासा उगम पाहण्याचं गुढ आकर्षण आपल्यात असतेच त्याप्रमाणेच कवितेची निर्मिती जाणून घ्यावी वाटणं स्वाभाविक आहे. पण निर्मिती प्रक्रिया मनाशी जोडली असल्याने गुंतागुंतीची असते, असे मत मांडले. कवी बालाजी इंगळे यांनी लेखनानंतरची भाव स्थिती हा विषयपुढे नेत कविता लेखनानंतर मनाला खूप आनंद होतो. जेव्हां मी कविता लिहून पूर्ण करतो. तेव्हां मला ही मनस्वी आनंद होतो. तेव्हां मी राजा असतो व मी आनंदाने भारावून जातो. कविच्या या आनंदी स्थितीची इतर कुठल्या आनंदाशी तुलनाच होऊ शकत नाही, असा भाव व्यक्त केला. सत्र अध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी नवकवी यांना काव्यनिर्मिती वेळी आपला अस्सल अनुभव व आपली बोलीभाषा याचा अवलंब केल्यास कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेते, असा सल्ला दिला. आपल्या कवितांचे दाखले देत खास शैलीत शेवट केला. या सत्राचे सुत्रसंचालन प्रमोद माने तर आभार गुंडू दुधभाते यांनी मानले. 

शेवटच्या समारोप सत्राचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे होते. मराठवाडा साहित्य परिषद उमरगा शाखेच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय गुडसूरकर यांची महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रा. किरण सगर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यशाळार्थी ज्योती डोळे आणि हंडरगुळीकर यांनी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

शेवटी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य ठाले यांनी नवकवी जुन्या जाणत्या साहित्यिकांचे साहित्य वाचले पाहिजे. हे सांगत नवोदित कवी लेखक इतरांचे वाचत नसल्याची खंत व्यक्त केली. कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले आणि नवकवीनां उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. 

या समारोप सत्राचे सुत्रसंचालन गुंडू दुधभाते यांनी केले तर आभार बालाजी मक्तेदार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उमरगा मसापचे सदस्या प्रा. अवंती सगर, गीता हिरास, उषा सगर, सदस्य रत्नाकर पतंगे, डॉ.सुहास मोहरीर, प्रा. हिरास, प्रा.डॉ महेश मोटे, हिराचंद देशमाने, मधुकर गुरव,बाळासाहेब माळी, कोतवाल पाशा, के. पी. बिराजदार, करीम शेख, प्रज्ञाजीत, तानाजी काळे लिंबराज सगर आदींसह श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

 
Top