उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कौडगांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प व्यक्त करत याबाबतचा दिड वर्षापासुन राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठवावा या मागणीसाठी जिल्ह्यातील १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे  यांना देण्यात येणार असून आज उस्मानाबाद येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बुथ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्हयातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून  देण्यासाठी आ.राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या विनंती वरुन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी उस्मानाबाद येथील कौडगाव औद्योगीक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती व या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. के.पी.एम.जी. संस्थेच्या माध्यमातुन एमआयडीसी ने प्राथमिक अहवाल तयार करून घेतला आहे. परंतू महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासुन दुर्दैवाने हा विषय प्रलंबित राहिला आहे. राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाषजी देसाई यांच्याकडे याबाबत बैठक घेण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेक वेळा केली परंतु त्यांची याबाबत अनास्था दिसून येते.

  इतर वस्त्रनिर्मिती उद्योगापेक्षा या तांत्रिक वस्त्र ( टेक्निकल टेक्सटाईल) उत्पादनाला जगभर अधिकचा वाव आहे. उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात या प्रकारचा उद्योग आल्यास येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. तांत्रिक वस्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाकडून नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन ही योजना राबविली जात असून महाराष्ट्राचे सुपुत्र ना. पियुषजी गोयल या विभागाचे प्रमुख असल्याने केंद्र सरकारच्या स्तरावर या प्रस्तावास पूर्ण सहकार्य मिळेल असा विश्वास ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. याबाबत उद्योग मंत्र्यांकडे वारंवार मागणी करुन देखील मंत्रीमंडळाच्या मान्यतेसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जात नाही.

 उस्मानाबाद सारख्या आकांक्षीत जिल्हयात यासारखा रोजगार निर्मीती करणारा प्रकल्प उभारल्यास येथील १० हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळु शकतो. कौडगांव येथे राज्यातील पहिल्या तांत्रीक वस्त्र निर्मीती प्रकल्पाची घोषणा करून ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी उस्मानाबादकरांना मोठी भेट दिली होती. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही संकल्पना पुर्णत्वास नेण्याचा मानस आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला होता. उस्मानाबाद करांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी १० हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आज उस्मानाबाद येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बुथ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये उस्मानाबाद येथे टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत मंत्रीमंडळाच्या शिफारसी सह प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.


 
Top