कळंब/प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील यांनी गुरुवार, दि.24 जून रोजी रात्री 10:30 वाजता भेट दिली. येथील कामकाजाची पाहणी करून येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.

 जयंतराव पाटील हे मराठवाडा दौर्‍यावर असून 24 जून रोजी  वाशी येथील पक्षाची बैठक संपवून रात्री 10:30 वाजता उस्मानाबादकडे जात असताना येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला आवर्जुन भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी केंद्रात रुग्णांवर केल्या जाणार्‍या उपचाराच्या पद्धती विषयी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांनी सविस्तर माहिती दिली. ना.पाटील यांनी येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून रुग्णांना पुढील निर्व्यसनी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ.तांबारे यांना व्यसनमुक्ती  केंद्रातील अडचणींविषयी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही ना.जयंत पाटील यांनी दिले.

 त्यांच्यामवेत राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
Top