परंडा / प्रतिनिधी : -

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  उमेद अंतर्गत कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व पोषण याचा दर्जा उंचावण्यासाठी माझी पोषण परसबाग विकसन मोहीम राबवण्यात येत असून याला परंडा तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. १५ जून पासून सुरू झालेल्या या मोहिमेत दि.२८ जून पर्यंत ७२० कुटुंबांमध्ये पोषण परसबागा तयार करण्यात आले आहेत.सदर मोहीम राबवण्यामध्ये परंडा तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे,अशी माहिती तालुका व्यवस्थापक मुकेश लक्षे यांनी दिली.

 पोषण परसबागेच्या माध्यमातून घरातील गर्भवती, स्तनदा, किशोरी,लहान मुले यांचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्षणीय मदत होणार असून रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी पिकवलेला भाजीपाला उपयोगी पडू शकतो. या माध्यमातून कुटुंबाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियाना मार्फत १५जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग मोहीम महाराष्ट्रभरात सुरू करण्यात आलेली आहे.

 परंडा तालुक्यातील सीटीसी ,कृषी सखी व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या माध्यमातून गाव पातळीवर पोषण परसबाग निर्मिती मोहीम जोरात सुरू आहे. सदरहू मोहीम यशस्वी करण्यासाठी डोंजाचे  प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे , अनाळाच्या प्रभाग समन्वयिका प्रिया पाटील, लोणी प्रभाग समन्वयक समाधान माळी, जवळा प्रभाग समन्वयक गवळी तसेच आरोग्य सखी विद्या अवताडे,प्रिया हजारे, आशा जगताप, नंदा जगताप ,इंताज शेख व सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, कृषी सखी, बँक सखी, उपजिविका सखी प्रयत्न करत आहेत. पोषण परसबाग निर्मिती साठी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुढे, गोरक्षनाथ भांगे, समाधान जोगदंड, अल्ताफ जिकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 
Top