उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे. थोडासा पाऊस असतानाही पाणी पाझरून रविवारी (दि.२७) पहाटे सहा वाजता छताचा काही भाग कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने गर्दी नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळली. नवीन इमारतीचे बांधकाम आठ वर्षांपासून रखडले आहे. दोन वेळेस भूमिपूजन होऊनही बांधकाम सुरू झाले नाही. दोन वेळा प्रस्ताव रद्द करून आता पुन्हा बीओटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

येथील बसस्थानकाची इमारत १९७३ च्या दरम्यान उभारली आहे. ही इमारत १० वर्षांपूर्वीच जीर्ण झाली. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यासाठी मागणी होत आहे. यासंदर्भात प्रक्रिया होऊनही बांधकामाकडे दुर्लक्ष सुरू आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कॅन्टीनच्या बाजूला छताच्या आतील थर अचानक कोसळला. त्यावेळी तेथे कमी गर्दी असल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. विशेष म्हणजे कोसळलेले ढपले मोठे होते. थेट आतील सळया उघड्या पडल्या आहेत. पहाटे थोड्या पावासाने पाणी छतामध्ये पाझरल्याने स्लॅबचा आतील भाग कोसळला. त्यानंतरही पडलेल्या भागातून व बाजूच्या भागातून पावसाचे पाणी पाझरुन खाली पडत आहे. यामुळे आणखी काही भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. सध्या येथील परिस्थिती पाहता प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. तसेच बसस्थानकातील फरशीही खचून जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथील परिस्थिती चांगली असण्याची गरज आहे. मात्र, सातत्याने येथील बसस्थानकाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा प्रक्रिया होऊनही याची दखल घेण्यास कोणीही तयार नाही. लोकप्रतिनिधींकडून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. बहुतांश लोकप्रतिनिधींना येथील बसस्थानकाची परिस्थितीच माहिती नाही. कधीच लोकप्रतिनिधींनी येथील बसस्थानकाची पाहणीच केलेली नाही. खासगी वैयक्तिक वाहनाने प्रवास केल्यामुळे त्यांची पावले कधीच स्थानकाकडे वळलेली नाहीत. आता तरी बसस्थानकाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या तर इमारतीसंदर्भातील मोठी दुर्घटना होऊन एखादा जीव जाण्याची प्रतीक्षा शासन व प्रशासन तर करित नाही ना?, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

 
Top