उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील कसगी सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र हद्दीत बांधण्यात येणाऱ्या तपासणी नाक्याचे बांधकाम रविवारी दि.27 रोजी कसगी ग्रामस्थ,शिवसैनिक व पोलिसांनी बंद पाडले.यामुळे सीमेवर थोडावेळ तणाव निर्माण झाला होता पण अखेर कर्नाटक पोलीस व स्थानिक प्रशासनास माघार घ्यावी लागली.

तालुक्यातील कसगी या गाव कर्नाटक सिमेवर आहे. या सिमेवर अधूनमधून कर्नाटक पोलीस प्रशासनाद्वारे तात्पुरते तपासणी नाके उभारले जातात.सदर तपासणी नाके हे नेहमी महाराष्ट्र राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. गुलबर्ग्याचे जिल्हाधिकारी यांनी नुकतेच या भागाची पाहणी करून कर्नाटक शासनाद्वारे या भागात नव्याने कायमस्वरूपी तपासणी नाके उभारण्याचे आदेश दिले होते.पण याला कसगी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता.त्यांनी याची माहिती स्थानिक प्रशासन व आमदार ज्ञानराज चौगुले याना सांगितली होती.त्यावरून आमदार चौगुले यांनी शनिवारी दि.26 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कसगी येथील कर्नाटक पोलीस प्रशासनाकडून  होऊ घातलेल्या तपासणी नाका आपल्या राज्यातील हद्दीत होऊ नये भविष्यात हा प्रश्न संवेदनशील होऊ शकतो यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले होते.तथापी कसगी ग्रामस्थांचा एवढा विरोध असताना ही रविवारी सकाळी कर्नाटक पोलीस प्रशासनाने सीमेवर तपासणी नाका उभारण्यासाठी वाळू,वीट, सिमेंट आणून टाकले होते व तपासणी नाक्याच्या बांधकामास सुरुवात करणार होते याची खबर लागताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, कसगी ग्रामस्थ व उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालूसुरे यांनी सीमेवर जाऊन बांधकामास विरोध दर्शविला.यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.यावेळी कसगी ग्रामस्थ,शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे व कर्नाटक पोलीस व प्रशासनातील लोकांसोबत शाब्दिक चकमक ही झाली.शेवटी कर्नाटक पोलिसांनी माघार घेत काम थांबविले.या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,तहसीलदार संजय पवार यांनी ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.सीमेवर आता उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


 
Top