उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोवीड-१९ बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच बरोबर आयसीयू उपचाराची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. जिल्ह्याचा मृत्युदर चिंताजनक असून सुयोग्य उपचारासाठी विशेषज्ञ व डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. ना.राजेश टोपे हे जिल्ह्याची जावई तर ना. अमित देशमुख हे पूर्वाश्रमीचे उस्मानाबादकर असल्याची आठवण करून देते जिल्ह्यातील अत्यावस्त रुग्णांच्या सेवेसाठी तातडीने विशेषज्ञ व आरोग्य अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशी आर्त साद आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संयुक्त पत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक मंत्री नामदार अमित देशमुख यांना घातली आहे.

राज्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोवीड-१९ महामारीने थैमान घातले आहे. ज्या गतीने रुग्ण संख्या वाढत आहे, त्या गतीने सुविधा निर्माण करणे शक्य होत नाही. मात्र तरीही या अडचणीच्या काळात सर्वतोपरी प्रयत्न करुन राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी मदत करत असल्याबद्दल दोघांचेही आभार मानत उस्मानाबाद मधील विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यात करोना बाधित उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८७८ असून दुर्दैवाने ९०३ मृत्यू झाले आहेत. देशाची किंवा राज्याची सरासरी बघता उस्मानाबाद चा मृत्यूचा दर अत्यंत चिंताजनक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात  ४०० पेक्षा जास्त ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णावर उपचार सुरु असून आयसीयू मध्ये ६० बेड आहेत व हे वाढविण्याची प्रक्रिया चालू आहे. रुग्णांना ऑक्सिजन जोडणी खाटा व रेमडिसीवीर सहजा सहजी उपलब्ध होत नाहीत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवा देण्यासाठी निकषाप्रमाणे १२ भीषक लागतात परंतु केवळ ४ उपलब्ध आहेत, भूलतज्ञ ६ च्या ठिकाणी २ व आरोग्य अधिकारी १० च्या ठिकाणी २ अशी सध्या चिंताजनक परिस्थिती आहे.  मार्च २०२० पासून आम्ही उस्मानाबादला विशेषज्ञ देण्याबाबत विनंती करीत आहोत. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काहींचे बदली आदेश काढले होते, परंतू केवळ २ च डॉक्टर रुजू झाले आहेत. पदवी व पद्युत्तर चे अंतिम वर्षातील विद्यार्थी व बंधपत्र निकषा प्रमाणे सेवा करत असलेले डॉक्टर्स यांना विविध जिल्ह्यात कामाची जबाबदारी दिली असून अशा ७०० डॉक्टरांपैकी केवळ दोघांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे, हे अन्यायकारक आहे. स्थानिक सत्ताधारी नेते व लोकप्रतिनिधीं या महत्वाच्या विषयाबाबत प्रयत्नच करत नाहीत ही मोठी दुर्दैवी बाब असल्याचे आ. पाटील यांनी मत व्यक्त केले.

त्यामुळे या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करत जिल्हावासियांचा आपल्यावरील हक्क व जिल्ह्याची निकड लक्षात घेवून आपण दोघांनी या महत्वाच्या विषयावर चर्चा करून उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी तातडीने विशेषज्ञ व आरोग्य अधिकारी पाठवावेत अशी  कळकळीची विनंती जिल्हावासियांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संयुक्त पत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री नामदार अमित देशमुख यांना घातली आहे.


 
Top