आई, बापासह बहिनालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सुपर क्लासवन अर्थात इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसमध्ये अधिकारी असल्याचे सांगून लोहारा येथील तरूनाने उस्मानाबादच्या मुलीला फसवून लग्न केले. एका वर्षात बिंग फुटल्यावर तोतया अधिकाऱ्याच्या आई, बापासह बहिनीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विवाह करण्यासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे याने हा प्रकार केल्याची चर्चा होत आहे. याप्रकरावरून खोटारडे पणाचा ईतका कळस असू शकतो का‌?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आजकाल खरेपणाचा जमानाच राहिला नसल्याची सतत प्रचिती येत आहे. सध्या मुलांना विवाह करण्यासाठी मुलगीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे खोटारडेपणा करून फसवणूक करत मुलीबरोबर विवाह करण्याचा प्रकार वाढला आहे. कोणी अधिक शेती किंवा खुप संपत्ती असल्याचे सांगून विवाह करत असतो. परंतु, लोहारा येथील एका तरुणाने थेट आयएएस अधिकारी असल्याचे सांगून लग्न करत खोटारडेपणाचा कळस केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारा येथील विश्वास विजयकुमार झिंगाडे याने आपण सुपर क्लासवन असल्याचे सांगितले. तो लोहारा गावात आपल्या कारवर दिवाही लावून फिरत होता. दिवा लावलेली गाडी घेऊनच तो उस्मानाबादला मुलगी पाहण्यासाठी आला. श्रेया दत्तात्रय कठारे या मुलीच्या घरच्यांना त्याने आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. मुलीच्या घरच्यांनीही विश्वास ठेवून धुमधडाक्यात दोन वर्षांपुर्वी लग्न लावून दिले. पण काही दिवसानंतर पती नोकरीवर जात नसल्यामुळे पत्नीने विचारले. तेव्हा लॉकडाऊन असल्याचे सांगून तो वेळ मारून नेत होता. जवळचा पैसाही संपला. तंगी वाढली. तेव्हा पत्नीने माहेरी याची माहिती दिली. नंतर माहेरच्यांनी तपास केला, दिल्लीला चौकशी केली. त्यावेळी तो तोतया अधिकारी असल्याचे समजले. आनंदनगर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेव्हा विश्वास झिंगाडे, त्याचा पिता विजयकुमार, आई विनोदिनी झिंगाडे व बहिन वसुंधरा भागानगरे यांना बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाला मुलगी मिळत नसल्यामुळे मुलगा व त्याच्या आई वडीलांनी हे कांड केल्याची चर्चा लोहारा व उस्मानाबाद शहरात आहे.

 
Top