वेळे पेक्षा अधिक काळ दुकाने सुरू ठेवली, 80 दुकानांवर कारवाई
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दहा लाख दंड वसूल


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यात दि. १ मे, २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून दि. १५ मे २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने/ आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सकाळी ११वाजेपर्यंत उघडण्याठी परवानगी देण्यात आलेली आहे तसेच इतर सर्व दुकाने/ आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले असून प्रत्येक शनिवार व रविवार या दोन दिवशी जनता कयूं घोषित करण्यात आलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद

तथापी सदरील आदेशाचे उल्लंघन करुन काही व्यवसायीक त्यांची दुकाने निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ उघडी ठेवत आहेत व जनता कयूंचे उल्लंघन करीत असल्याने निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाकडून संबधीत व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळणा-या नागरीकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दिनांक १ व २ मे,२०२१ रोजी महसूल प्रशासनाकडून उस्मानाबाद जिल्ह्यात आदेशाचा अवमान करुन दुकाने उघडी ठेवणा-या ८० दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांची दुकाने सील केली आहेत तसेच त्यांचेकडून दंडात्मक रक्कम देखील वसूल केली आहे.

आजपावेतो सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणा-या ३३३१ नागरिकांकडून रुपये १०,९०,५०० दंड वसूल करण्यात आलेला आहे तसेच शॉपिंग मॉल, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, धार्मीक स्थळे व इतर सार्वजनिक ठिकाणच्या ११७७ दुकानांनी / आस्थापनांनी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचेकडून रुपये ४,७४,५७८ इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरीदेखील काही व्यवसायिक त्यांची दुकाने दिलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ उघडी ठेवून त्यांचे व नागरीकांचे देखील आरोग्य धोक्यात आणत आहेत. तरी, याव्दारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.

असे आवाहन कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद


 
Top