उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला 17 मे पासून सुरुवात होत आहे. 45 वर्षांच्या वरील नागरिकांना, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असून यासाठी प्रत्येक तालुक्यात एक लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस 22 फेब्रुवारी 2021 पूर्वी म्हणजे 84 दिवसापूर्वी घेतला आहे अशाच लाभार्थीना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात असे एकूण 2 हजार 083 लाभार्थी आहेत. शक्यतो लाभार्थी यांनी ज्या ठिकाणी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच ठिकाणी दुसरा डोस घेतल्यास गर्दी होणार नाही. आधारकार्ड व पहिला डोस घेताना नोंदवलेले ओळखपत्र घेऊन जावे.केवळ दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.

लसीकरण हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. 84 दिवस पूर्ण केलेले लाभार्थी यांची यादी प्रशासनाने तयार केली असून त्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात 211, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर 317,उपजिल्हा रुग्णालय उमरगा 188, उपजिल्हा रुग्णालय परंडा 337, उपजिल्हा रुग्णालय कळंब 285, ग्रामीण रुग्णालय लोहारा 110, ग्रामीण रुग्णालय वाशी 202, ग्रामीण रुग्णालय भूम 433 व पोलीस रुग्णालय उस्मानाबाद येथे केवळ न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता लसीकरण करण्यात येणार आहे.

 
Top