उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पालकमंत्री महोदय  यांनी जिल्ह्यात येऊन उपाययोजना करण्याची मागणी करून भाजपने पत्राच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पालकमंत्री शंकरराव गडाख यांना आर्त साद घातली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. सर्व जनता, व्यापारी, प्रशासन त्रस्त झाले आहेत. अन्य जिल्ह्यात पालकमंत्री स्वत:हून लक्ष घालून उपाययोजनांकडे लक्ष देत आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख अशावेळी गायब झाले आहेत. यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी त्यांना अनाहूत पत्र लिहून जिल्ह्यात येण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

नितीन काळे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व जिल्हातील नागरिकांना सहकार्य करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना जिल्ह्यात येण्याचे आग्रहाचे आमंत्रण आहे. पालकमंत्री २६ जानेवारीच्या ध्वजारोहणनंतर आपला पदस्पर्श जिल्ह्यात झालाच नाही. जिल्ह्यातील जनता आतुरतेने आपण याल व आपल्या नावातील शंकरा प्रमाणे तिसरा डोळा उघडून कोरोनाचा नायनाट कराल यासाठी आपली वाट पाहत आहे. पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना आपण भेटाल, त्यांना धीर द्याल, जे बाधित आहेत त्यांना औषध उपचारासाठी काही तरी आरोग्य यंत्रणा उभी कराल, अबाल वृद्ध, महिला,लहान मुले यांच्या आरोग्याची काळजी घ्याल अश्या वेड्या आशेवर आपली जिल्ह्यात वाट पाहत आहोत, असे काळे यांनी म्हटले आहे.

 
Top