आमदार राणा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढत आहे.उपचाराखालील रुग्णांची संख्या ३ हजारांवर गेली आहे असून, या पार्श्वभूमीवर प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत असले तरी त्यांना काम करताना अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने संयुक्तपणे काम करून यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना संक्रमित असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठका होत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होईपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री महोदयांना जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधिकृत करण्याची मागणी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की,पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीपासून जिल्ह्यात येवू शकले नाहीत. ते कोरोना संक्रमित झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना आहे.मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत इतर कोणतेही मंत्री परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आले नाहीत, ही शोकांतिका आहे. उस्मानाबाद जिल्हा राज्यात आहे की नाही असा प्रश्न जिल्हावासीयांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा भासत होता, कोविड सेंटरमधील आहाराबाबत रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व योग्य ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणे गरजेचे आहे. याबाबत ठरवून दिलेल्या नियम व निकषाप्रमाणे कार्यवाही होते की नाही हे पडताळणे गरजेचे असून यावर देखरेख आवश्यक आहे. रुग्ण संख्येचा वेग पाहता खाटांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक सुविधांसह औषधे, डॉक्टर्स व सपोर्टिंग स्टाफ गरजेचा आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना अनेक काम करताना अनेक मर्यादा येतात.पालकमंत्री संक्रमित झाल्याने सद्य स्थितीत त्यांना कामाचा व्याप न देता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांवर तात्पुरती जबाबदारी देणे आवश्यक आहे. काही कठोर निर्बंधांसोबतच प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी गरजेची आहे.अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व सपोर्टिंग स्टाफबाबत काही उणिवा आहेत. अनेक वेळा मागणी करूनही त्या पूर्ण केल्या जात नाहीत. फिजिशियन, भूलतज्ञ, अतिदक्षता विभाग तज्ञ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व सपोर्टिंग स्टाफ आवश्यकते प्रमाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रेमडेसिव्हिर,ऑक्सिजन सह इतर आवश्यक औषधांचा पर्याप्त साठा, लसीकरणाचा वेग व चाचण्याची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top