उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद अंतर्गत विविध शाखांचे कामकाज पाहणारे अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या तालुक्याला व तालुक्यातील गावांना भेटी देवून कोव्हीड-19 अनुषंगाने कामकाज पाहण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी आज दिले आहेत.

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी, नागरिकांमध्ये, रुग्णांमध्ये जनजागृतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी  स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देशित केलेले आहे.  सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोना सदृश्य रुग्णांची तपासणी केली जात आहे.  त्याचबरोबर 88 उपकेंद्रासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीकरण केले जात आहे.  या कामाचा तसेच जनजागृती अनुषंगाने होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा तालुक्यांना नियुक्त केलेल्या संपर्क अधिकारी यांनी आपआपल्या तालुक्याला प्रत्यक्ष भेटी देवून घ्यावा असे निर्देश कोरोना अनुषंगाने घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत देण्यात आलेले आहेत. 

      यात कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना दवंडी देणे, धार्मिक स्थळ तसेच ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी, रिक्षा, आरोग्य विभागाची वाहने इ. माध्यमातून ऑडीयो क्लीपच्या सहाय्याने जनजागृती करणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे, आणि रुग्ण व आरोग्य विभाग यात समन्वय साधणे, प्राधान्याने लसीकरण कामकाज पार पाडणे, तसेच कोव्हीड-19 सदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी, कोवीड चाचणी नमूने प्राप्त व अहवाल यांचा दैनंदिन आढावा घेणे, कोव्हीडग्रस्त रुग्णाचे घरावर स्टीकर लावणे, रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी कोविड-19 अनुषंगाने आवश्यक ते कामकाज पार पाडत आहेत अथवा कसे याची तपासणी करणे, ऑनलाईन संकेतस्थळावर दैनंदिन माहिती नोंदीची खातरजमा करणे, विनामास्क फिरणारे व्यक्ती, तसेच कोविड-19 अनुषंगाने नमूद केलेल्या बाबींचा अवलंब न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई अनुसरावी याबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. 

  तालूका संपर्क समन्वय अधिकारी म्हणून उस्मानाबाद- कार्यकारी अभियंता (बांधकाम),नितीन भोसले तुळजापूर-, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व),अनंत कुभार उमरगा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य),डॉ.संजय तुबाकले लोहारा- जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) व्यंकटेश जोशी, कळंब-  जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) बळीराम निपाणीकर,वाशी- कृषी  विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमणशेटे, भूम- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव, परंडा- कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.)  श्री.दशरथ देवकर  यांचा समावेश आहे.

 संपर्क अधिकाऱ्यांनी भेटी दरम्यान स्थानिक अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.या विशेष बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,अनिलकुमार नवाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,सुरेश केंद्रे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य) डॉ.संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी (प्रा) अरविंद मोहरे,शिक्षणाधिकारी(माध्यमिक) गजानन सुसर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) नितीन दाताळ,डॉ.के.के.मिटकरी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, डॉ.किरण गरड,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, यांच्यासह सर्व संपर्क अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

 
Top