उस्मानाबाद / प्रतिनिधी - कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत.
या घटनेची माहिती अशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील ते रहिवाशी होते.
त्यांच्यावर याच दिवशी उस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या आई-वडिलांना रक्तदाब कमी झाल्याने पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले (माजी शिक्षण अधिकारी, ८०) यांचे शुक्रवारी (दि.२३) सायकांळी पाच वाजता निधन झाले. तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले (वय ७८) यांनीही प्राण सोडला. आठ दिवसापासून अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली. दोघांची कोविड टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली. या दांपत्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबियास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.