मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी


उमरगा / प्रतिनिधी: 

उमरगा, लोहारा तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच शिल्लक नसल्यामुळे येथील रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे, ही बाब लक्षात घेवून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे उमरगा व लोहारा येथे २०० बेड्सचे जम्बो कोविड सेंटर उभे करावेत, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याने सध्या शासकीय व खासगी रुग्णालयात बेडचा तुटवडा जाणवत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना लातूर किंवा सोलापूर येथे रेफर करावे लागत आहे. त्यासोबतच ऑक्सिजन सिलिंडर व रेमिडीसिवीर इंजेक्शनचा कमालीचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः उमरगा तालुका हा सीमावर्ती भागातील असल्याने शेजारील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व बिदर जिल्ह्यातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. या सर्व बाबींमुळे येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

यामुळे उमरगा व लोहारा येथे २०० बेड क्षमतेचे प्रत्त्येकी १-१ जम्बो कोविड सेंटर करून याठिकाणी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन व आवश्यक त्या प्रमाणात रेमेडीसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.

 
Top