उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

धाराशिव साखर कारखाना लि. युनिट१ चोराखळी उस्मानाबादच्या ४५ केएलपीडी असावनी व इथेनॉल प्रकल्पाचे वास्तुपुजन आ. कैलास पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

धाराशिव साखर कारखान्याने नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिध्द असलेल्या पंढरपूरच्या डिव्हिपी उद्योग समूहाने कारखाना क्षेत्रात पदार्पण केल्यापासून नवनवीन संकल्पना राबवत आपल्या अनोख्या शैलीने सर्वांना चकित केले आहे.सध्या वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून देण्यासाठी धाराशिव साखर कारखाना लि. युनिट १ चोराखळी उस्मानाबादच्या ४५ केएलपीडी असावनी व इथेनॉल प्रकल्पाचा वास्तुपुजन करण्यात आले. 

याप्रसंगी दहिफळचे सरपंच चरणेश्र्वर पाटील व शिल्पाताई पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. धाराशिव कारखान्याच्या असावनी प्रकल्पातून दिवसाला ४५ हजार लिटर प्रतिदिन मद्यार्क निर्मिती व ६० हजार प्रतिदिन लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव, वाढती मागणी, वाढते प्रदूषण या सर्व पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मिती काळाची गरज बनली आहे. साखर उत्पादनासोबत आज धाराशिव साखर कारखान्याने उपपदार्थ निर्मितीमध्ये पाऊल टाकत इतर कारखान्यांसमोर आदर्श ठेवला आहे.या प्रकल्पाची उभारणी केल्याने सभासदांना आणि ऊस उत्पादकांना योग्य मोबदला देणे कारखान्याला शक्य होईल.तसेच कारखान्याला शेतकरी व कामगारांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील असे मत कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 
Top