उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन  त्यावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी आणखी तीन रुग्णांलयातील खाटा राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. या रुग्णालयाचा वापर डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) म्हणून करण्यात येणार आहे. यात पुढील रुग्णालयांचा समावेश आहे. हे सर्व रुग्णालये उस्मानाबाद तालुक्यातील आहेत.

नवोदय मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 20, कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या खाटांची संख्या 10,  या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना अंगीकृत आहे. डॉ. मोरे स्पेशालिटी हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 30, राखीव खाटांची संख्या 30 आणि जावळे हॉस्पीटल एकूण खाटांची संख्या 18, राखीव खाटांची संख्या 18 आहे. या दोन्ही हॉस्पीटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत नाही. या तीन रुग्णालयांतील एकूण 68 खाटांपैकी 58 खाटा राखीव आहेत.

उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय आणि जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपरोक्त यंत्रणा स्थापन करुन संनियंत्रण करावे तसेच ही माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करण्यात यावी. सर्व डीसीएचसी मध्ये नियंत्रण करण्याची सर्वसाधारण जबाबदारी व डीसीएचसी चे नोडल अधिकारी म्हणून जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी हे काम पाहतील. महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांनी योजनेअंतर्गत लाभार्थी कोव्हिड रुग्णांना उपचार देणे बंधनकारक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज दिले आहेत.

 
Top