परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा नळाद्वारे केला जात असून नळाला दुर्गंधीयुक्त पिवळे, गढूळ असे पाणी येत आहे.यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका नाकारता येत नाही.परंडा नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करावा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी नगरपरिषद चे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांना निवेदन दिले आहे.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरात नळाद्वारे गेल्या काही दिवसा पासून दुषित पाणीपुरवठा होत असून यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिना-कोळेगाव व खासापूर धरणात मुबलक पाणी साठा उपल्बध आसताना नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी. तसेच कोविड १९ महामारीचा धोका वाढत चालला असल्याने शहरात फवारणी करावी.शहरात सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही.त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व गटारांची सफाई करावी.अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तुंबलेल्या गटारींमुळे शहरात डासांचे प्रमाण वाढले असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यासाठी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करून बी एस सी पावडर टाकावी.कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या काही विभागात पंधरा दिवसातून एकदा येत आहेत. घंटागाड्या ही नियमित कराव्या,अश्या विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत. 

दिलेल्या निवेदनावर नगरसेवक मकरंद जोशी ,  मुसा हन्नुरे , सौ.आसिफा अब्बास मुजावर , सौ. उर्मिला विठोबा मदने , सौ.समिना अनवर लुकडे,  रामदास जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top