उस्मानाबाद/ प्रतिनिधी;

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभागातर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनामुळे वेबिनार द्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक मंचाचे प्रभारी अध्यक्ष ॲड. मुकुंद सस्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 एनआयसीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे या होत्या.तर यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख,सहायक पुरवठा अधिकारी मनिषा माने,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरिक्षक प्रशांत भांगे,वजने व मापे कार्यालयाचे निरिक्षक गणेश मिसाळ आणि टी.टी.टेकाळे,अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्रीमती पाटील,तर वेबिनार द्वारे जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य अजित बागडे,राहुल घोडके,विशाल शिंदे,सचिन कवडे,हेमंत वडने,मेधा कुलकुर्णी,रोहिनी साहू,माया पवार आदी उपस्थित होते.

 जिल्हयात दरमहा 50 ते 60 ग्रहाकांच्या तक्रारी ग्राहक न्यायालयात दाखल होत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक न्यायालयाचे काम मधल्या काळात झाले नसल्याने प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे.सध्या प्रामुख्याने महावितरण कंपनी,बँका आणि इन्सुरन्‍स कंपन्यांशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे.महावितरण कंपनीशी संबंधित तक्रारी प्रामुख्याने अवाजवी वीज देयकाबाबत असतात.तेव्हा महावितरणने ग्राहक तक्रारींचा निपटारा करणारी यंत्रणा निर्माण केल्यास त्यांच्याविरुध्द ग्राहक न्यायालयात येणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण कमी होईल,असे मत ॲड.सस्ते यांनी यावेळी व्यक्त केले.

ग्राहक तक्रारींचा विचार करताना कोण चुकतय या ऐवजी काय चुकलय या दिशेने काम करण्याची गरज आहे.सध्या ई-कामर्स संबंधी व्यवहारास ग्राहकांची अधिक फसवणूक होतेय अशा तक्रारी येतात.अनेक वेळा अशा विषयात कुणाकडे दाद मागावी याबाबत ग्राहकांना काहीही कल्पना नसते.याबाबत लोकांचे प्रबोधन होण्याची गरज आहे.असे सांगून श्रीमती आवले यांनी यापुढे काम करताना जागो ग्राहक जागो ही आपली टॅगलाईन समोर ठेवून काम करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपण राष्ट्रीय ग्राहकदिन 24 डिसेंबर रोजी साजरा करतो तर जागतिक ग्राहक दिन 15 मार्च रोजी दरवर्षी साजरा करतो.या दिनानिमित्त ग्राहकांच्या हक्काविषयी वैश्विक जनजागृती केली जाते.जागातिक बाजारपेठेत ग्राहक भाडवल जाऊ नये म्हणून  ग्राहकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे,अशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.

सुरुवातीस स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रामाची सुरुवात करण्यात आली.ग्राहक मंचच्या सदस्यांनीही यावेळी मत व्यक्त केले.श्रीमती मनिषा माने यांनी आभार मानले.

 
Top