उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते झाला.

शुभारंभ प्रसंगी सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य वजन व्यापाऱ्यांपेक्षा अधिकच्या भावाने होणार आहे. त्यामुळे तालुका खरेदी-विक्री संघाच्या हरभरा खरेदी केंद्राला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना हमी भावाने हरभरा खरेदी करण्याची सोय आणि कोणतेही गैरप्रकार, विनाशुल्क चाळणी यामुळे शेतकऱ्यांचा जास्त फायदा करून देणाऱ्या केंद्रात शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांचा हरभरा शासनाचा हमीभाव ५१०० रुपये प्रति क्विंटल दराने सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची चाळणी शुल्क न आकारता खरेदी केला जाणार आहे. चाळणी केलेल्या शेतमालातील निघालेला कढत्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाचून निव्वळ हरभराचे वजन बिनचुक करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका खरेदी-विक्री संघाच्याा मार्केट यार्डातील खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करावी. तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने ऑनलाईन खरेदी नोंदणी चालु असून त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, शेतकऱ्यांना या खरेदी केंद्रावर आपले वाहन जास्त वेळ उभे करावे लागू नये म्हणून तत्काळ चाळणी व खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका खरेदी-विक्री संघाच्या हरभरा खरेदी केंद्राला पसंती द्यावी, असे बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल काळे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हा.चेअरमन दिनेश देशमुख, बाजार समितीचे चेअरमन दत्तात्रय देशमुख, मुकुंद सोकांडे, सुभाष पाटोळे, मच्छीन्द्र रसाळ, झुंबर बोडके, प्रमोद देशमुख, समाधान देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माने अादी उपस्थित होते.


 
Top