उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची  कडक अंमलबजावणी संबंधित सर्वच यंत्रणांनी करावी.जिल्हयातील आरोग्य विभागाने दररोज 1800 ते 2000 कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांच्या चाचण्या कराव्यात,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या 1800-2000 चाचण्या प्रतिदिन होणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील. शहरातील खाजगी दवाखाने (हॉस्पिटल्स), प्रयोगशाळा (लॅब्स) साठी जिल्हा परिषद, नगरपालिकामधील विस्तार अधिकारी यांची नेमणूक करावी.त्यांनी लक्षणे असलेल्या (symptomatic) लोकांची अन्टीजेन (Antigen), आरटीपीसीआर (RTPCR), चाचणी सक्तीने करून घ्यावी. अन्टीजेन चाचणीचे दर कमी झाले आहे.त्यामुळे मान्यताप्राप्त रुग्णालयांनी ना नफा ना तोटा तत्वावर चाचण्या करून माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय यांच्याकडे रोज सादर करावी.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधून लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी केली जाईल याची दक्षता घ्यावी. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करावा. ग्रामीण भागातील पॉझिटीव्ह (positive) रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची जबाबदारी आहे. शहरी भागात संबंधित मुख्याधिकारी न. प./न. पं. यांची जबाबदारी आहे.

तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोराना केअर सेंटर्स (CCC) सुरू करण्याची तयारी करावी.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोरोनाच्या उपचाराच्या कामावरून कमी केलेल्या कर्मचा-यांची ज्येष्ठता सूची तयार करुन आवश्यकतेनुसार वॉर्डबॉय, नर्स, टेक्निशियन यांना पुन्हा कोरोनाच्या उपचाराच्या कामावर परत घ्यावे.विलगीकरण कक्ष (Quarentine सेंटर्स) पुन्हा सुरू करावयाचे झाल्यास त्याच्या जागा आज दि. 9 मार्च पर्यंत निश्चित करण्यात याव्यात.

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भीय आदेशान्वये नेमून दिलेल्या कामकाजाबरोबरच या आदेशाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा,असेही या आदेशात जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी म्हटले आहे.


 
Top