उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केवळ नागपूर, पुणे-मुंबई हैदराबाद या शहरांपुरतीच रेल्वे सेवा मिळत असलेल्या उस्मानाबादकरांना बंपर लॉटरी लागली आहे. कोल्हापूर-धनबाद ही एक्स्प्रेस उद्यापासून (दि. १९) सुरू होत असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे. ही रेल्वे उस्मानाबादेत तीन मिनिटे थांबणार असून १७ नवीन स्थानकांशी उस्मानाबाद जोडले जाणार आहे. धनबाद एक्स्प्रेस ही कोल्हापूरहून पूर्वी पुणे, औरंगाबाद, नागपूरमार्गे धावत होती. ही गाडी उस्मानाबाद-लातूरमार्गे सोडण्याची मागणी अनेक प्रवासी संघटनांकडून होत होती. यासाठी लातूर येथील शामसुंदर मानधना यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या मागणीचा अभ्यास केला. तेव्हा ही गाडी उस्मानाबादमार्गे वळविल्यास ३३५ किलोमीटरचे अंतर कमी होणार हे लक्षात आले. रेल्वे प्रवासही १० तासांनी कमी होणार असल्याने प्रवाशांचे प्रतिसाद वाढू शकतो हे अधोरेखित झाल्यानंतर ही रेल्वे उस्मानाबाद, लातूरमार्गे वळविण्याचा निर्णय झाला. शिवजयंतीपासून (दि. १९) हे रेल्वे प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे. तर परतीचा प्रवास प्रत्येक सोमवारी सुरू होणार आहे. येताना ही गाडी बुधवारी उस्मानाबादेत पहाटे ६ वाजता पोचेल. दुपारी १२ वाजता ती कोल्हापुरात पोचेल. कोल्हापुरातून

पहाटे ४.३५ वाजता ही गाडी सुटेल. ती उस्मानाबादेत सकाळी १०.२७  वाजता वाजता येणार आहे. तीन मिनिटांचा थांबा घेऊन ती साडेदहा वाजता मार्गस्थ होईल. लातुरात १ वाजून ५ मिनिटांनी पोचेल. तेथून ती १ वाजून १० मिनिटांनी निघेल. परळीत सव्वाचार, परभणीत सहा वाजता पोहोचेल. साडेसातला ती नांदेडहून निघेल. त्यानंतर किनवट, अदिलाबाद, वणी, सेवाग्राममार्गे ती नागपूरला सकाळी सातला पोचेल.

 १७ नवीन स्थानके जोडली

सध्या या मार्गावर उस्माबादहून नागपूरपर्यंत जाता येते. त्यापुढे जायचे असेल तर थेट रेल्वे नव्हती. ती कसर धनबाद एक्स्प्रेसमुळे भरुन निघाली आहे. यामुळे आता नागपूरच्या पुढे आमला, बेतुल, घोरडोंग्री, इटारसी जंक्शन, जबलपूर, कतनी, सतना, प्रयागराज, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन भाबुआरोड, ससराम, देहरी, अनुग्रहरोड, गया, कोदर्मा जंक्शन, पारसनाथ व धनबाद जंक्शन इथपर्यंत जाता येणे शक्य आहे.

पर्यटक, भाविकांची सोय

या रेल्वेमुळे कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूर, तुळजापूर (उस्मानाबाद) परळी वैजिनाथ, नांदेड, वणी, नागपूर, इटारसी, प्रयागराज, गया आदी पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रे एका मार्गावर आली आहेत. यामुळे भाविकांसोबतच पर्यटकांचीही सोय झाली आहे.

कोल्हापूरसाठी नवा पर्याय

दरम्यान, या रेल्वेमुळे कोल्हापूरसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावते ती सध्या कोरोनामुळे बंद आहे. दरम्यान, ती गाडी सुरू करत असताना आता धनबाद गाडीचे वेळात्रक बदलण्याची गरज आहे. नागपूर एक्स्प्रेस सोमवारी व शुक्रवारी आहे. त्यामुळे कोल्हापूर-नागपूर यादरम्यान एकाच दिवशी दोन गाड्या असतील. ते पाहता दोन्ही पैकी एका गाडीचा दिवस बदलण्याची गरज आहे.

 
Top