उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची बुधवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभा विविध विभागांच्या अखर्चित निधी व साहित्य खरेदीतील गैरव्यवहाराच्या आरोपावरून चांगलीच वादळी ठरली. यावेळी विरोधकांनी ग्रामीण भागातील विकासकामांसाठी आलेला काेट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याबद्दल संताप व्यक्त करत याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी केली. यावेळी विरोधकांकडून हाेत असलेल्या आरोपांना उत्तर देताना अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला परंतू विरोधक चांगले आक्रमक असल्याचे पहावयास मिळाले. 

बुधवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पुशसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, बांधकाम सभापती दत्ता देवळकर, सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीपासूनच अखर्चित निधीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी काॅँग्रेसचे गटनेते प्रकाश आष्टे यांनी शाळांमध्ये इ-लर्निंगच्या सुविधेसाठी मिळालेले चार कोटी रुपये परत गेले याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. याच विषयावरून काँग्रेसचे धीरज पाटील यांनी यातील कामाचा ठेका विशिष्ठ कंत्राटदाराला मिळावा, असा काहींचा आग्रह असल्याने यातूनच सदरील निधी अखर्चित राहून परत जाण्याची वेळ आल्याचा आरोप केला.

 
Top