उस्मानाबाद/ प्रतिनिधी
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानीत तसेच स्वयंअर्थसाहाय्य च्या सर्व शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन कार्यवाही सुरु झाली आहे.
आरटीई प्रवेशपत्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा रजिस्ट्रेशन 21 जानेवारी 2021 ते 08 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये सुरु केली होते. मुख्याध्यापकांनी शाळांची नोंदणी करुन व्हेरीफिकेशन करुन घ्यावयाचे आहे. पालकांनी संभाव्य वेळापत्रकानुसार 09 ते 26
फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. संभाव्य पहिली सोडत दि. 05 ते 06 मार्च 2021 या कालावधीत होणार आहे. यावर्षी एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतिक्षा यादी राहणार आहे. पालकांनी अर्जामध्ये अचूक आणि खरी माहिती भरावी, निवासाचे स्थान अचूक दाखवावे. पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त होताच अलॉटमेंट लेटर पालकांच्या लॉगईन वरुन स्वत: प्रत घेवून तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दिनांक 09 ते 26 मार्च 2021 पर्यंत जाऊन अभिलेखाची तपासणी करुन घ्यावी. त्याच दिवशी शाळेत जावून प्रवेश घ्यावा. संभाव्य प्रतिक्षा यादीतील प्रवेशाचा टप्पा 27 मार्च 2021 पासून सुरु होणार आहे.
वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.(अ) भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) व दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात आला आहे. एच.आय.व्ही. बाधीत / एच.आय.व्ही.प्रभावित बालकांचाही समावेश करण्यात आला आहे.
दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश होत आहे. निवासी पुरावा निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज / टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी, गॅस बुक, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, नोंदणीकृत एक वर्षाचा भाडेपट्टा, फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येतील. जात प्रमाणपत्र पुरावा (वंचित गटासाठी).
उत्पन्न पुरावा पालकांचे 2019-20 किंवा 2020-21 वर्षाचा उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला किंवा पगारपत्रकाचा कंपनीचा दाखला. विधवा, घटस्फोटीत व आई अथवा वडील या पैकी कोणताही एक पर्याय निवडला असला तर याचा पुरावा. आरटीई 25 टक्के मोफत प्रवेश योजनेचा लाभ पालकांनी आपल्या पाल्यासाठी घ्यावा यासंदर्भात काही अडचणी आल्यास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किंवा या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.उस्मानाबाद यांनी केलेले आहे.