उस्मानाबाद / प्रतिनिधी -
उस्मानाबाद येथे मंजुर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढील वर्षीपासुन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याची पुर्तता जलद गतीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.आरोग्य व वैद्यकीय शिक्षण यांच्यामध्ये सांमजस्य करार करण्याबाबतही सुचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.
या बैठकीला उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय करण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढच्या कार्यवाहीसाठी दोन्ही विभागाच्या सचिवासह बैठक घेतली.यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बैठकीमध्ये महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीवर चर्चा केली. त्यामध्ये अधिष्टाता नियुक्ती, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचा सामंजस्य करार,पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या मुद्यांचा समावेश होता.आमदार कैलास पाटील यांच्यासह मी पीपीपीच्या मुद्याला विरोध दर्शविला. ग्रामीण भागामध्ये अशी गुंतवणुक करण्यासाठी तयार होणार नसल्याची अडचण आम्ही बोलुन दाखविली. सिंधुदुर्गच्या धर्तीवर महाविद्यालयासह रुग्णालयदेखील शासनाच्या अधिपत्याखाली असावे अशी आग्रही मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी मान्य करुन त्या पध्दतीने सुधारणा करण्याच्या सुचना यावेळी दिल्या आहेत.
साहजिकच पुढील काही वर्षी या मुद्यावरुन येणाऱ्या अडचणीतुन प्रश्न रेंगाळण्याची शक्यता यामुळे संपणार असल्याचे मत खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले. पुढच्याच वर्षी प्रवेश प्रक्रिया व्हावी यासाठी अधिष्टाता यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे, त्याची नियुक्ती करण्याचे आदेश यावेळी बैठकीत मुख्यमंत्री यानी दिले. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातुन पुढील प्रक्रियेचा सोपस्कार करणे शक्य होणार आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यास त्याला अधिक गती मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने त्याचीही कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यानी दिले.जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या मंत्र्यानी मार्गी लावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानुन त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजीवकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य विभागाचे प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने आदीसह प्रमुख अधिकाऱ्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थिती लावली होती.
