तुळजापूर/ प्रतिनिधी
शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ घेणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लाभार्थींना दैनंदिन दिल्या जाणाऱ्या धान्यासह आता साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तुळजापूर तालुक्यातील रास्त भाव दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्याचा लाभ मिळणाऱ्या कार्डधारकांना रेशन दुकानावर प्रतिकिलो २० रुपयांप्रमाणे एक किलो साखर उपलब्ध करून देण्यात अाली आहे.
तुळजापूर तालुक्यासाठी ४५४ क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे. रेशन दुकानावर धान्याचा लाभ मिळणाऱ्या अंत्योदय, प्राधान्य, शेतकरी योजनेतील ४५ हजार ४७९ लाभार्थींना ही साखर दिली जाणार आहे. तालुक्यातील अंत्योदय योजनेतील ५०६० कार्डधारक लाभार्थी आहेत. प्राधान्य योजनेतील २९ हजार ९१३ लाभार्थी आहेत व शेतकरी योजनेतील १० हजार ५०६ कार्डधारक लाभार्थी आहेत. दैनंदिनी रेशन दुकानावर कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्यांसह दिवाळी सणाच्या मुहूर्तावर कार्डाला एक किलो साखर उपलब्ध करून देण्यात आली. तालुक्यातील ४५४७९ रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे.अन्नधान्यासह दिली जाणारी साखर तात्काळ वाटप करण्याच्या सूचना तुळजापूर तहसिल पुरवठा विभागाकडून दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. अंत्योदय, प्राधान्य,शेतकरी कार्डधारकांनी ही साखर प्रती २० रुपये किलो प्रमाणे विकत घेऊन त्याची पावती घ्यावी असे आवाहन तुळजापूर तहसील पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी संदीप जाधव यांनी केले आहे.