अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी हेक्टरी २५ हजार व ५० हजार रुपये मदतीची मागणी करणारे मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, वाढीव मदतीसाठी दिवाळीनंतर लढा उभारू, असा धीर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळ पिकांसाठी २५ हजार रुपये,अशी तोकडी रक्कम मंजूर केली आहे. त्यात देखील केवळ ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. खरडलेली जमीन, दगावलेली जनावरे, घरांचे नुकसान यापोटी स्थायी आदेशाप्रमाणे जुजबी अनुदान मिळत आहे. परंतु विहिरीत गेलेला गाळ काढण्यासाठी, ठिबक व तुषार संचाचे झालेले नुकसान, विद्युत पंपाचे झालेले नुकसान याचा अजूनपर्यंत कोठेही विचार झालेला नाही. खरडून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेच्या तुलनेत अत्यल्प रक्कम दिली जात आहे. यासाठी घालण्यात आलेली दोन हेक्टरची मर्यादा अन्यायकारक आहे. विमा उपलब्ध नसलेल्या पिकांना भरीव मदतीची अपेक्षा होती, परंतु ती देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी निराश होणे स्वभाविक आहे, परंतु अधिकची मदत मिळवून घेण्यासाठी दिवाळीनंतर राज्य सरकारच्या विरोधात लढा उभा करू, बळीराजाने नाउमेद होऊ नये, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. काही शेतकऱ्यांचे नुकसान असूनदेखील मदतीच्या यादीत नाव नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून पोहोच घ्यावी व याची प्रत ८८८८६२७७७७ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावी, असे आवाहन आमदार राणा पाटील यांनी केले आहे.
