ढोकी ते लातूर महामार्गालगत असलेल्या पत्र्याच्या घरात टिप्पर घुसून पती-पत्नी जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ढोकी येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोघांवर सोलापूर आणि लातूर येथे उपचार सुरू आहेत.
ढोकी येथील प्रकाश सुरवसे यांचे लातूर महामार्गालगत पत्र्याच्या शेडचे घर आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरवसे कुटुंबीय झोपले होते. अचानकपणे भरधाव वेगातील टिप्पर त्यांच्या घरात घुसला. या दुर्दैवी घटनेत प्रकाश बाबुराव सुरवसे (वय 55) व त्यांची पत्नी मुजुरूकाबाई प्रकाश सुरवसे (वय 50) हे दोघे टिप्परखाली सापडल्याने दोघांचाही चेंगरून जागीच मृत्यू झाला. घरातील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींचे प्राण वाचविण्यासाठी ग्रामस्थ व ढोकी पोलिसांनी उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने एकावर लातूर तर दुसर्या गंभीर जखमीवर सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एकाच कुटुंबातील पती-पत्नींचा चेंगरून मृत्यू झाल्याने सुरवसे परिवारासह गावकर्यांवर शोककळा पसरली आहे. आमदार पाटील यांनी सुरवसे परिवाराची भेट घेवून सांत्वन केले. दरम्यान ढोकी पोलिसात टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
