उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मारहाण प्रकरणातील आरोपींविरोधात शहर पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देवूनही गुन्हा दाखल न करणार्‍या पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. शेट्टी यांनी दिले दिले आहेत. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या आरोपी व तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील वडगाव (सि.) येथील राजेंद्र कुर्‍हाडे यांनी मुलीच्या लग्नखर्चासाठी गावातील स्वतःच्या मालकीचा प्लॉट गावातीलच नागनाथ पांढरे यांना विक्री केला. तो प्लॉट आरोपी सूरज जाधव, आदेश जाधव, विश्वास जाधव, महादेव जाधव, अनिता जाधव व इंदूबाई जाधव यांना हवा होता. मात्र त्यांनी योग्य किंमत न दिल्याने कुऱ्हाडे यांनी नागनाथ पांढरे यांना विक्री केला. त्याचा राग मनात धरून 21 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता कुऱ्हाडे यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या खिशातील आठ हजार 500 रूपयांची रोकड व एक डायरी हिसकावून घेतली. गावातील अंकुश मोरे, नागनाथ पांढरे आदींनी भांडण सोडविल्याने त्यांचे प्राण वाचले. जखमी झालेले कुऱ्हाडे यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पोलीस चौकीतील पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांचा जबाब घेतला. परंतु कोणतीही कारवाई केली नाही. उपचारानंतर राजेंद्र कुऱ्हाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द फिर्याद दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर कुर्‍हाडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली. मात्र तिथेही त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कुर्‍हाडे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.

अ‍ॅड. एम. बी. माढेकर व अ‍ॅड. एम. एम. जाधव यांच्यामार्फत 16 ऑक्टोबर 2019 रोजी प्रकरणातील मूळ फिर्यादी राजेंद्र कुऱ्हाडे यांनी प्रथम वर्ग न्यायालयात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. न्यायदंडाधिकारी व्ही. बी. शेट्टी यांनी या प्रकरणाची चौकशी करून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांंना मारहाण प्रकरणातील आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 
Top