उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस तदर्थ व जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा बुधवारी (दि.२८) सुनावली आहे.

याबाबत प्रकरणाची बाजू मांडणारे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड.सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा दत्तू शिंदे (२४ रा. धारूर ता. उस्मानाबाद) याने प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीस

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. यामध्ये दि.१३ ते १४ जुलै २०१७ च्या रात्री पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे, सातारा आदी ठिकाणी पळवून नेऊन तिथेही अत्याचार केले. याप्रकरणी दि.१४ जुलै २०१७ रोजी पीडितेच्या वडिलांनी बेंबळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा नोंद झाल्यानंतर तत्कालीन तपासअधिकारी पोलिस उपनिरीक्षक दंडे यांनी तपास पूर्ण केला तर पोलिस उपनिरीक्षक एस.एल.जमदाडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणाची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.राय यांच्यासमोर सुनावनी झाली. 

यावेळी सरकारपक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एम.एस.पवार यांनी काम पाहीले.यावेळी समोर आलेले पुरावे तसेच पीडितेच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कृष्णा दत्तू शिंदे या पोक्सो कायद्यांतर्गत दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड तसेच कलम ३६३ नुसार १ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

 
Top