उस्मानाबाद / प्रतिनिधी
मोबाईल व पैसे हिसकाविताना विरोध केला म्हणून ३७ वर्षीय तरूणाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणात एका सराईतास न्यायालयाने ५ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ऋषिकेश जिवराज कामठे (वय ३४, रा. कोथरूड, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात सहा तर अलंकार पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कमलाकर शरनू घोडके (वय २९, रा. कोथरूड, मुळ रा. मुरूम, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. नागेश दगडू गुंड (वय ३७, रा. केरूळ, जि. उस्मानाबद) असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास स्वारगेट परिसरात घडली. फिर्यादि व नागेश हे दोघेही वाहनचालक म्हणून काम करतात. नागेश याला शुक्रवारी बावधन येथून नाशिकसाठी जाण्याची ऑर्डर मिळाली होती. यामुळे, तो उस्मानाबादहून पुण्याला आला होता. घटनेच्या दिवशी त्याने फिर्यादिला फोन करून हडपसरपर्यंत आलो आहे, एखाद्या खासगी वाहनाने स्वारगेटपर्यंत येतो, तेथे घ्यायला ये असा फोनद्वारे निरोप दिला. त्यानंतर त्याने फिर्यादिस स्वारगेट येथील कोथरूड बसथांब्यावर थांबला असल्याने सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी तेथे आले असता नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या पॅन्टचा हूक तुटलेला तसेच चोरखिसा बाहेर आला होता. यावेळी फिर्यादीने काय झाले विचारले असता नागेश याने दोन अॅक्टिव्हा वरील तरूण माझ्या खिशातील मोबाईल आणि पैसे हिसकावत होते. मी त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने धारदार वस्तूने मांडीवर मारून माझा मोबाईल व पैसे चोरून नेल्याचे सांगितल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ऋषिकेश याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. तो सराईत गुन्हेगार असून त्याविरोधात कोथरूड व अलंकार पोलिस ठाण्यात मिळून सात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व गाडी जप्त करायची आहे. नागेश याकडून आरोपीने जबरदस्तीने हिसकावुन नेलेला मोबाईल, रोख रक्कम व सिमकार्ड बाबत तपास करायचा असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील अनंत दिक्षित यांनी केली.