उस्मानाबाद  / प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हयात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांही शेतकऱ्यांच्या पिकासह जमिन वाहून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी झाले आहे. हातातोंडाला आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. माध्यमांनी शेतकऱ्यांची बाजू दाखविल्यानंतर उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यांवर आजी-माजी-मुख्यमंत्र्यासह शरद पवार, छत्रपती संभाजीराजे आले आहेत. शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पोकळ घोषणा नको, साहेब भरीव मदत करा, अशी मागणी केली आहे. 

उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यात छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, यांनी मंत्री अमित देशमुख, संजय बनसोडे यांच्यासह दौरा केला. या दौऱ्यांत शरद पवार यांनी नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्य सरकारची मदत पुरणार नाही, त्यामुळे केंद्र सरकारची मदत देणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी मात्र शेतकऱ्यांनी केंद्राची मदत जेंव्हा मिळेल तेंव्हा बघु , परंतु राज्यसरकारची मदत मिळने आवश्यक आहे. तातडीने मदत मिळाली तरच दसरा, दिवाळी सण साजरा करता येईल, नाहीतर जगणे सुध्दा कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने दिली.

 
Top