मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस आज बुधवार सकाळी दहा वाजेपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे कोरेगाव साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढ्याला पूर आला होता. जोरदार पावसामुळे शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.
मंगळवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मुळे उमरगा तालुक्यातून वाहणाऱ्या बेनितुरा नदीला मोठा पूर आला आहे. तसेच उमरगा शहरातील गुंजोटी रोड परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तशेच मुन्सी प्लॉट, वृंधांवन नगर, कुंभार प्लॉट, काळे प्लॉट, जुनी पेठ, बँक कॉलनी, औटी गल्ली भागातील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले आहे.
जोरदार पावसामुळे जकेकूर येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्या वाटी पाणी जात आहे. गावातील नाल्यालगत असणाऱ्या घरात पाणी शिरल्या मुळे संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे. सांडव्यावाटी जाणाऱ्या पाण्यामुळे औराद, गुंजोटी गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाण्यामुळे गुंजोटी येथील घरात पाणी शिरले आहे. विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा सध्या खंडित झाला असून दुरुस्तीच काम सुरु आहे. या धो-धो पडलेल्या पावसामुळे काढणी सुरू असलेले सोयाबीन तसेच उसाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे ऊसाचे फड च्या फड आडवे पडले आहेत.