उमरगा  / प्रतिनिधी-
उपजिल्हा रुग्णालयचे कोवीड रुग्णालयात रुपांतर झाल्यापासून इतर आजारांच्या रुग्णांना वेळ व पैसा वाया जात आहे. उमरगा शहरात मिनाक्षी मंगल कार्यालय, बहुजन वसतीगृह व इदगाह या तीन ठिकाणी १५० पेक्षा जास्त रुग्णावर उपचार केले जाऊ शकतात.  त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेवा पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.
 उमरगा शहर हे वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेतलेले शहर आहे. उमरगा व लोहारा तालुक्यासह तुळजापूर तालुक्यातील तसेच कर्नाटक राज्यातील रुग्ण मोठया प्रमाणावर येतात. त्यामुळे उमरगा शहरातील आरोग्य नगरीचा मोठा विस्तार झालेला आहे. राज्यासह सिमावर्ती भागातील रुग्णांची मोठी संख्या असल्याने खाजगी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी संख्याही जास्तच आहे. मात्र मागील साडेपाच महिन्यापासून कोरोनाच्या भितीने अनेक रुग्णांलय बंद तर सुरू असणाररे रुग्णालयही पूर्णवेळ सुरु नाहीत. २४ तास सेवा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार होता. पण उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केल्याने सर्वसामान्य व गरीब घरच्या रुग्णांचे हाल होत आहेत.
उमरगा शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील मिनाक्षी मंगल कार्यालयात १०० खाटाचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. बहुजन वसतीगृह व इदगाह हाॅलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या तीन ठिकाणी १५० पेक्षा जास्त रुग्णावर उपचार होऊ शकतात. तर उपजिल्हा रुग्णालय ही कोवीड रुग्णालयात रुपांतर केल्याने येथील ओपीडी पूर्णपणे बंद आहे. परिणामी रक्तदाब, मधुमेह, थंडीताप, साधा ताप, सर्दी, खोकला, कान, नाक, घसा, डोळे, दातदुखी, डिलेव्हरी, गरोदर माता तपासणी, पाच वर्षांपेक्षा लहान बाळांचे डोस देणे इत्यादी आजाराच्या रुग्णांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी सुरू केली तर सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी सोय होणार आहे. एप्रिलपासून ओपीडी बंदच असल्याने गोरगरीब जनतेला नाहक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. बीपी च्या रुग्णाला सरासरी दरमहा ५०० रुपये, शुगरच्या रुग्णाला दरमहा ५०० रुपये खर्च करावा लागत आहे. २४ तास सेवा देणारे खाजगी रुग्णालय बहुतांश वेळ बंद व अॅडमीट करुन घेत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. शासकीय रुग्णालयात होणारे बाळांतपण, सिजर पूर्णपणे बंद असल्याने गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयात जाऊन मोठी किंमत मोजावी लागत आहे. पाच वर्षांखालील बाळांचे डोस देण्याचे कामही बंदच आहे. खाजगी डॉक्टरकडून  रक्ताच्या विविध तपासणीसाठी जबर किंमत घेतली जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात होणा-या मोफत रक्त लघवीच्या तपासणीसाठी शेकडो रुपये मोजावे लागत आहेत.
उमरगा शहरात १०० बेडचे मिनाक्षी मंगल कार्यालय, बहुजन वसतीगृह व इदगाह हाॅलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या तीन ठिकाणी कोविडचे स्वतंत्र वैद्यकीय पथक पाठवून उपजिल्हा रुग्णालय जर सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले केले तर नागरीकांची मोठी सोय होणार आहे.

 
Top