उमरगा/ प्रतिनिधी-
३० सप्टेंबर १९९३ रोजी लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या भुकंपात ५२ खेडे व गावाचे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर तालुक्यातील गावांचे पुनर्वसन करून दिले, मात्र २५ वर्ष लोटत आले तरी अद्याप घरांचे मालकी हक्क पत्र (कबाले) देण्यात आले नसल्याने लोकांना अनेक समस्या निर्माण होत असून त्यासाठी त्वरित कबाले देण्यात यावे अशी मागणी बुधवारी (दि ०९) लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूकंपग्रस्त भागातील ५२ गावातील घर मालकांना २५ वर्षानंतरहि घराचे मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाला) आत्तापर्यंत मिळाले नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होताहेत. दोन वर्षापूर्वी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी भूकंप भागातील पुनर्वसन झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करून परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधिताना दिले होते, अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहेत. कबाले मिळाल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, मालकी हक्क व इतर कामासाठी होणारी अडचण सुटण्यास मदत होणार आहे.२५ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून भुकंप भागातील घराचे कबाले मिळवून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर किरण दासमे, संभाजी सुरवसे,लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे, धिरज गोळे, दत्तात्रय हडपत यांच्यासह सदस्यांच्या सह्या आहेत.
 
Top