तुळजापूर / प्रतिनिधी-
 श्री तुळजाभवानी मातेच्या जामदारखाना व खजिन्यातील ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या चांदीचे मौल्यवान अलंकार व नाणी गायब झाल्याचे प्रकरण वर्षभरापूर्वी समोर आले होते. याप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तत्कालीन धार्मिक दिलीप नाईकवाडी यांच्यावर रविवारी (दि.१३) अखेर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु, नाईकवाडींच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार देवाण-घेवाणीदरम्यान नियमावलीचा भंंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक असताना दिलीप नाईकवाडी यांनी २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पदाचा दुरूपयोग करत मंदिर संस्थानचा खजिना व जमादार खान्यातील मौल्यवान ७१ प्राचीन नाण्यांसह भाविकांनी अर्पण केलेले ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तूंचा वैयक्तिक स्वार्थासाठी अप्रामाणिक अपहार करून चोरी केल्याचे तुळजापूर पोलिस ठाण्यात मंदिर व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नाईकवाडी सेवानिवृत्त होत असताना पदभार व देवस्थानच्या विविध वस्तु, दागिने, दप्तराची देवाण-घेवाण हाेत असताना या प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांनीही जुन्या चार्जपट्टीतील अनेक माैल्यवान, एेतिहासिक दागिने पदभार देताना रेकाॅर्डवर दिसत नसतानाही याबाबीकडे गांभीर्याने पाहिले नाही. नूतन धार्मिक व्यवस्थापकांनीही फक्त त्यांच्याकडे हस्तांतरीत वस्तु, दागिन्यांची नाेंद दाखवली. परंतु, हा संपूर्ण प्रकार तुळजाभावानी पूजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशाेर गंगणे यांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी प्रथम माहिती अधिकारात या पदभार हस्तांतरणाची कागदपत्रे मिळवून नंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्यानंतर करण्यात अालेल्या चाैकशीतून हा प्रकार समाेर अाला व अखेर अहवालाच्या दहा महिन्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या अादेशावरून दिलीप नाइकवाडी यांच्यावर गुन्हा नाेंद झाला अाहे. या प्रकरणात ४२०,४०९, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ३८१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे हे करणार आहेत.
नाईकवाडी यांचा १८ वर्षाच्या धार्मिक व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्तीनंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचा पदभार सिध्देश्वर इंतुले यांच्याकडे सोपवला. या पदभार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तिघांची समिती नेमून त्यांच्या देखरेखीखाली पदभार सोपवण्याचे आदेश होते. त्यानुसार पदभाराची देवाणघेवाण ही झाली. मात्र यावेळी मंदिर संस्थानच्या दप्तरी नोंद असलेले अनेक मौल्यवान, ऐतिहासिक दागिने चार्जपट्टीत आले नव्हते. परंतु, याची काेणीच गांभीर्याने दखल घेतली नाही.
 
Top