उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोणत्याही क्षेत्रात निस्वार्थपणे काम केल्यास गरजूंची सेवा घडते, जलजीवन या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने घेण्यात आलेल्या गौरी-गणपती आरास स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. नामानंद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रुपचे सदस्य उमेश मोटे होते. यावेळी स्पर्धेच्या परिक्षक अश्विनी मोटे, होमिओपॅथीतज्ञ डॉ. अमोल गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कांबळे म्हणाल्या की, सध्याच्या काळात लोकांमध्ये पर्यावरण, प्रदूषण, बचत गटांतून आर्थिक प्रगती, जलजीवन या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. गौरी-गणपती आरास स्पर्धेत 427 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून कोरोना काळातील आधुनिक शिक्षणपध्दती आणि अडचणी, वृक्षसंगोपनाचे महत्व, किल्ल्यांचे जतन या विषयांवर प्रकाश टाकून सामाजिक संदेश दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगून या स्पर्धेचे कौतुक केेले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या लक्ष्मीताई हणमंत पाटील यांना मानाची पैठणी साडी, केशर आंब्याचे वृक्षरोप, कुटुंबासाठी अर्सेनिक अल्बम गोेळ्या देवून गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक विजेत्या भाग्यश्रीताई विष्णू यादव यांना प्रेशर कुक्कर, आंब्याचे वृक्षरोप, कुटुंबासाठी अर्सेनिक अल्बम गोेळ्या, तृतीय क्रमांक विजेत्या कुसुमताई मधुकर लोहार व ज्योतीताई चंद्रकांत खापरे यांना प्रत्येकी एक घड्याळ, आंब्याचे वृक्षरोप, कुटुंबासाठी अर्सेनिक अल्बम गोेळ्या देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य चंदन भडंगे, सूत्रसंचालन प्रा. धनंजय भोसले व आभार सचिन व्हनसनाळे यांनी मानले. यावेळी ग्रामसेवा ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
837 कुटूंबातील गणेशमूर्तींचे संकलन
तालुक्यातील बेंबळी येथे मागील चार वर्षापासून विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्या ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने मंगळवारी गणेश विसर्जनदिनी 837 कुटूंबांतील व सहा लहान मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती व निर्माल्याचे संकलन करण्यात आले. दिवसभर जमा झालेल्या सर्व श्रींच्या मूर्तींचे यथोचित विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या मंडळांच्या गणेशमूर्ती मिरवणुकीमुळे यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मागील चार वर्षांपासून बेंबळीसह परिसरात जेमतेम पाऊस झाल्याने नदी, नाले व विहिरी कोरड्याठाक होत्या. यंदाही पाऊस कमी असल्याने नदीमध्ये पाणी कमी आहे. या पार्श्वभूमीवर सन 2017 पासून ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने ग्रामस्थांकडून घरी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनदिनी अत्यल्प पाण्यात, गटारयुक्त पाण्यात विसर्जित करतेवेळी नकळत होणारी विटंबना थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मल्लिाकार्जुन मंदीर येथे मूर्ती संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यंदा चौथ्या वर्षीही ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. कोरोनामुळे सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणूका यंदा रद्द करण्यात आल्या होत्या. रथात ठेवण्यात येणार्या गणेशमूर्ती यंदा ग्रामस्थांनी ग्रामसेवा ग्रुपकडे आवर्जून जमा केल्या. दिवसभरात एकूण 837 कुटूंबांनी तसेच सहा लहान गणेश मंडळांनी आपल्या श्रींच्या मूर्ती ग्रुपच्या स्वाधीन केल्या. पैकी बारा गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. दिवसभर संकलित झालेल्या सर्व मूर्तींचे उमरेगव्हाण शिवारातील मोठ्या खणीतील पाण्यात यथोचित विसर्जित करण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाकडून सदस्यांचा सत्कार
बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आय. शेख, पोलीस उपनिरीक्षक सज्जन वाघमोडे, पोलीस नाईक सचिन कपाळे, दिनकर गोरे, सुधाकर भांगे व अन्य पोलीस कर्मचार्यांनी गणेशमूर्ती संकलन केंद्रास भेट दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करून ग्र्रुपच्या सदस्यांचा हार व श्रीफळ देवून सत्कार केला. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनीही सदस्यांशी संवाद साधून सर्व उपक्रमांची माहिती घेतली.