उस्मानाबाद / गोविंद पाटील -
 अस्वच्छतेमुळे होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी नागरिकांनी शौचालयाचा वापर करणे गरज आहे. मात्र, अनेक कुटुंब व नागरिक शौचालयाचे बांधकाम करूनही उघड्यावर शौचास जातात. यामुळे ८ ऑगस्ट २०२० पासून गंदगीमुक्त अभियान सुरू करण्यात आले असून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर सरपंच, ग्रामसेवकाकडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सरपंच, ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पायाभूत सर्वेक्षण २०१२ प्रमाणे गावातील सर्व कुटुंबांचा समावेश करून शौचालय बांधकाम करण्यात आलेले आहे. ज्या कुटुंबांनी शौचालय बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून १२ हजार रुपयाप्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बेसलाइन सर्वे २०१२ मध्ये जे कुटुंब समाविष्ट झालेले नाहीत, त्या उर्वरीत कुटुंबांनाही एलओबी आणि एनएलओबी अंतर्गत समावेश करून गावामध्ये जास्तीत जास्त शौचालयाचे बांधकाम करून त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले आहे. परंतु, शौचालय बांधकाम करूनही काही नागरिक उघड्यावर शौचास जातात, ही बाब निदर्शनास आलेली आहे. कोविड – १९ या रोगाची भयानक परिस्थिती आहे. विविध संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शौचालयाचा वापर करण्याची गरज आहे. मात्र, वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे ८ ऑगस्ट २०२० पासून देशामध्ये गंदगीमुक्त अभियान चालू करण्यात आले असून गावातील संपूर्ण घाण कमी करून गावे १०० टक्के स्वच्छ करणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी गंदगी मुक्त अभियानाच्या अनुषंगाने गावामध्ये ज्या कुटुंबातील सदस्य अथवा इतर नागरिक उघड्यावर शौचास जातात. त्यांनी शौचालयाचा वापर करावा व उघड्यावर शौचास बसू नये, याबाबत संबंधित कुटुंबांना तात्काळ नोटीस देवून शौचालयाचा वापर करण्याबाबत सक्त ताकीद द्यावी. अन्यथा १३ ऑगस्टपासून जे नागरिक उघड्यावर शौचास जातील, त्या सर्वांना दंड आकारणी करून ग्रामपंचायत स्तरावरून कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकांना लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. याबाबत केलेला दंड व कार्यवाहीची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या nbaosmanabad@gmail.com या ई-मेलवर दर सोमवारी पाठवण्याचे सुचवले आहे.
 
Top