तुळजापूर / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने पोस्कोसह, अत्याचाराच्या कलमाखाली २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
तुळजापूर पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सोन्या मंगेश भोसले उर्फ आकाश याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी करून आरोपी सोन्या मंगेश भोसले उर्फ आकाश विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
या पोक्सो विशेष खटला क्र. ४८ / २०१९ ची सुनावणी उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालय क्र.- १ च्या न्यायाधीश रेश्मीता राय यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता जयंत देशमुख यांनी आरोपी विरुध्दचे पुरावे व युक्तीवाद प्रभावीपणे मांडला. याची दखल घेऊन न्यायालयाने सोमवारी (दि.२४) याप्रकरणात आरोपी सोन्या भोसलेला दोषी ठरवून भा.दं.स. कलम - ३७६ (३) सह पोक्सो कायदा कलम- ४ च्या उल्लंघनाबद्दल फौ.प्र.सं. कलम- २३५ (२) अन्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने वाढीव कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने पीडित पुनर्वसन योजनेतून पीिडत मुलीस नुकसान भरपाई मंजूर केली असून, ती रक्कम तिच्या पालकांमार्फत तिला हस्तांतरित केली जाणार आहे.

 
Top