उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून कळंब तालुक्यातील मोहा येथे एकाची कत्तीने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २ अाराेपीपैकी मुख्य आरोपी महिलेच्या पतीस समोर आलेले पुरावे व साक्षी याद्वारे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर तत्कालीन विधीसंघर्ष बालक असलेल्या दुसऱ्या आरोपीस चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डबर सोडण्यात आले.
शासकीय अभियोक्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहा येथील संजय दिलीपराव मडके याला त्याच्या पत्नीसोबत गावातील श्रीरंग शाहू भोईटे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. ६ सप्टेंबर २०१७ रोजी भोईटे व संजयच्या पत्नीमध्ये एकमेकांना भेटण्याबाबत मोबाइलवरून बोलणेे झाले होते. ही बाब संजय मडके यास माहिती झाल्यानंतर त्याने एका विधीसंघर्ष बालकासह संगनमत करून त्याच दिवशी संजय मडके याने भोईटेला दुचाकीवर बसवून त्याच्या शेतात नेऊन वाद घातला. त्यानंतर साथीदार विधीसंघर्ष बालक याला कत्ती घेऊन बोलावून सदरील कत्तीने भोईटेवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भोईटेचा मृतदेह तसेच मोटारसायकल बाभळगाव शिवारातील शेतात टाकून नंबरप्लेट तोडून टाकून दिली. तपास पूर्ण करून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे व मुख्य शासकीय अभियाेक्ता शरद जाधवर यांनी मांडलेली भक्कम बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संजय मडके यास जन्मठेपेची शिक्षा व १ हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली.

 
Top