प्रतिनिधी /उस्मानाबाद
 जिल्ह्यासह शहरातही हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. परिणामी शहरातील अनेक भागात सध्या गल्ल्या सील करण्यात आल्या असून, आता गल्ल्यांबरोबरच कार्यालयेही सील होऊ लागली आहेत. यापूर्वी बँक, पाटबंधारे विभाग सील झाले होते. बुधवारी  जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातीलच एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्हा परिषद सील करण्यात आली असून त्याची पत्नी डाकघर कार्यालयात नोकरीस असल्याने हे कार्यालयही सील करण्यात आले आहे. तर गुरूवारी शहरातील निंबाळकर गल्लीतील संगीता गॅस एजन्सीजवळ एका रूग्णांचा पॉझीटीव्ह रिपोर्ट बुधवारच्या रात्री आल्यामुळे गुरूवारी सकाळपासून नगर वाचनालय ते मसोबा मंदिर पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. कोरोनाच्या शहरातील वाढत्या प्रवेशासामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद शहरात मागील महिनाभरापासून हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गल्ली-बोळातील हे सत्र मंगळवारी जिल्हा परिषदेत पोहोचले. झेडपीच्या आरोग्य विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याला चार दिवसांपासून बरे वाटत नसल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यावर तो पॉझिटिव्ह आला आणि संपूर्ण झेडपी प्रशासनाची एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह संपूर्ण झेडपीच कुलुपबंद करण्यात आली असून संपर्कात आलेल्या २४ कर्मचाऱ्यांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच क्लाेज संपर्कातील काही जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर झेडपीच्या इमारतीचे सर्व प्रवेशद्वारे कुलुपबंद तर परिसरात शुकशुकाट होता. ही इमारत निर्जंतुकीकरणानंतरही उघडण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदरील कर्मचाऱ्याची पत्नी डाकघर  कार्यालयात कर्मचारी असल्याने  व. मंगळवारी ती महिला कार्यालयात कार्यरत होती. तिच्या पतीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे कळताच डाकघर आॅफिसही बंद ठेवून तेही निर्जंतुकीकरणानंतर उघडले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
स्वॅबनंतर कर्मचारी क्वाॅरंटाइन का नाही
शासकीय रुग्णालयाच्या नियमानुसार ज्या संशयिताचा स्वॅब तपासणीसाठी घेतला जातो त्या संशयितास सिव्हिलमधील संशयित वॉर्डमध्ये स्वॅबचा अहवाल येईपर्यंत देखरेखेखाली ठेवण्यात येते. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेतील सदरील कर्मचारी मंगळवारीही कामावर होता. त्यानेच कोरोनाबाबतचे अहवालही पाठविले. त्यामुळे स्वॅब घेतलेल्या संशयित मोकळा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाचा शहरातील प्रवेश चिंताजनक
उस्मानाबाद शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येने ५० आकडा पार केला आहे. उस्मानपुरा, एमआयडीसी माढा कॉलनी, उंबरे कोठा, महात्मा गांधीनगर, पापनाश नगर, झोरी गल्ली, रामनगर, माळी गल्ली, समता कॉलनी आणि आता निंबाळकर गल्लीमध्ये कोरोना रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच रूग्ण सापडल्याने शहरवाशियांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हयात आतापर्यंत ३३१ कोरोना बाधीत रूग्ण झाले असून त्यापैकी २०७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११० रूग्णांवर सध्या उपचार चालू आहेत.

 
Top