
गोविंद पाटील/प्रतिनिधी
उस्मानाबाद-बेंबळी-उजनी या राज्यमार्गचे काम संत गतीने व निकृष्ट पध्दतीने होत असल्यामुळे हा रस्ता जीवघेना बनला आहे. त्यातच मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे रस्त्याचे रूपांतर घसरगुंडीत झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या -येणाऱ्या दुचाकीधारकांना खड्यांचा अंदाज न आल्याने व अचानक गाडी चिखलात घसरत असल्यामुळे त्यांना प्रसाद मिळत असल्याचे अनेक प्रसंग घडत आहेत. तसेच उस्मानाबाद ते उजनी या राज्यमार्ग रस्त्यास बैलगाडी रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने बुधवार दिं. ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास रेशनचा माल वाहतूक करणारा (महाराष्ट्र शासनाची लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारीत धान्य वितरण पध्दत) आयशर टेम्पो (एम.एच २५ यू ३६५१) चक्क घसरून चिखलात रूतून बसला. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. संबंधित रस्त्याचे प्राथमिक स्वरूपातच क्वॉलीटी कंट्रोलकरून तपासणी करावी, अशी मागणी बेंबळी येथील दक्षता समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
उस्मानाबाद पासून बेंबळी मार्गे जिल्हयाची हद्द असलेल्या उजनी पार्टीपर्यंत अॅन्युईटी योजनेतंर्गत रस्ता रूंंदीकरणाचे काम एस.बी. इंजिनिअर्स औरंगाबाद मार्फत गेल्या अनेक महिन्यापासून कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे ह्या रस्त्याची अवस्था असून अडचण तर नसून खोळंबा अशी झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच येथे रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना होण्याची संभावना वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर एका साईडवर टाकलेली खडी दुसऱ्या साईडवर आल्याने व येथे निर्माण झालेल्या खड्डयामुळे तसेच चिखलामुळे येथील प्रवास जीवघेणा बनला आहे. याच रस्त्यावर होत असलेली घसरगुंडीमुळे टु-व्हिलरधारकांसोबत अन्य वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या कामासाठी सुमारे १०४ कोटी रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयापासूनच्या कामाचाही समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराकडून काम करण्यात दिरंगाई होत असल्याने व या कंत्राटदाराकडे यंत्रणाच नसल्यामुळे हे काम संथ होत असल्याचे बोलले जात आहे. कोणताही शासकीय स्तरावरील व्यक्ती या कामावर हजर नसतो त्यात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या व कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोट्यावधींचा दंड वसूल होणार का ?
एस.बी. इंजिनिअर्स औरंगाबाद या कंपनीकडे उस्मानाबाद – बेंबळी- उजनी या रस्त्याच्या कामासाठी गौणखनिज पुरविण्याचे काम होते. या रस्त्यासाठी एसबी इंजिनिअर्सने ११ हजार ५०० ब्रॉस उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात ३४,४९३ ब्रॉस गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दि.१९ जून रोजी याप्रकरणी कळंब व उस्मानाबाद तहसीलदार यांना नोटीस बजाऊन सदरील कंपनीवर दंडात्मक कारवाई करून या रक्कमेची वसुली करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दंडाची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात असून खरंच ती वसूल होणार की केवळ कागदी कारवायांमध्येच प्रक्रीया रेंगाळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.