उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्ह्यात १ लाखाहून अधिक नागरिक म्हणजेच २५ ते ३० हजार कुटुंब रेशनकार्ड नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत.रेशनकार्ड नसल्याने त्यांना त्यांच्या हक्काचे स्वस्त धान्य मिळत नाही,यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील घेता येत नाही.समाजातील एक मोठा वर्ग केवळ रेशनकार्ड नसल्याने आपल्या हक्कापासून वंचित राहत असल्याने अशा घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने रेशनकार्ड आपल्या दारी हे अभियान राबविले असून ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांनी आपल्या परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा व याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप नेते आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका (रेशनकार्ड) हा महत्वाचा दस्त आहे.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य तर मिळतच नाही यासोबतच  हे नागरिक शासनाच्या इतर लाभापासून देखील वंचित राहतात. अशा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने “रेशनकार्ड आपल्या दारी अभियान” राबविण्यात येणार असून आज शिराढोन तालुका कळंब येथे या अभियानाचा शुभारंभ आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात गावातील आठ कुटुंबियांच्या घरी जाऊन रेशनकार्ड  मिळण्यासाठीचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पंडितराव टेकाळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, दत्ता साळुंके, सुरेश व्हनराव, लक्ष्मण देशमुख, किरण पाटील, फेरोज पठाण, श्रीकृष्ण जाधवर, सुरेश महाजन, विकास कोंडेकर, दत्ता माकोडे, कृष्णा माकोडे, शाम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदींजीं सारखे संवेदनशील मनाचे नेतृत्व असल्याने देशात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी नागरिकांना दरमहा ५ किलो गहू/तांदूळ व १ किलो हरभरा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला व ज्यांना रेशनकार्ड नाही अशा नागरिकांना देखील ही मदत दिली असल्याचे सांगत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा १०००० कुटुंबाना आम्ही धान्याचे किट्स देण्याचा निर्णय घेतला मात्र त्याला राज्य सरकारने आडकाठी घालण्याचे पाप केलं  व याबाबत कोर्टाचे दार ठोठावले असता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाटप करू सांगितले मात्र ते देखील केले नाही असा आरोप त्यांनी केला.
नवीन रेशन कार्ड काढायचे असल्यास नागरिकांना अनंत अडचणी येत असून त्यासाठी त्यांना शिधावाटप कार्यालयात सतत फेऱ्या माराव्या लागतात.परिणामी नागरिकांचा वेळ,पैसे आणि श्रम खर्ची पडते. महसूल खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची संख्या ३०,००० पर्यंत आहे. यातील बहुतांश गोरगरीब कुटुंबाची गुजराण रेशन धान्यावरच अवलंबून असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यांची अडचण दूर करण्यासाठी व त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली.
उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी च्या वतीने उद्यापासून जिल्हाभरात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना रेशनकार्ड देण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वंचित कुटुंबांचा शोध घेऊन त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यालयीन प्रक्रिया पार पाडतील, वंचित कुटुंबानी यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन आपल्या शहरातील, गावातील भाजपच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा व या अभियानाचा लाभ घेऊन आपला हक्क मिळवावा असे आवाहन आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलं आहे.
 
Top