उस्मानाबाद/ राजा वैद्य
कोरोना महामारीचा फैलाव जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनतेसाठी कांही नियम व अटी घालून दिल्या आहेत. मोटारसायकलवर एकट्याने प्रवास करने, चारचाकी गाडीमध्ये तींघानी प्रवास करने, बाजारात सुरक्षीत अंतर राखने, बाहेर फिरताना मास्कचा उपयोग करने आदी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग आज ६ जुलै रोजी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. ग्रामीण भागात अनेकांना या नियमांचे माहिती नसल्यामुळे मोटारसायकलवर दोघाजणांना जाताना महसूल यंत्रणेच्या पथकाने अनेकांना पकडून दंड केला. एका मोटारसायकल चालकाकडे ५०० रूपए दंड भरण्याची रक्कम नसल्याने त्यांनी महसूल यंत्रणेस आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही डबल सीट जात होतो, असे सांगून दंड भरण्यास असमर्थता दाखविली. हा प्रकार चालू असतानाच विद्यमान आमदारांनी संबंधिताची चांगली ओळख असल्यामुळे त्यांना ५०० रुपये देऊन दंड भरण्यास सांगितले.
उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा चौकात सदर घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर निपाणीकर, आपल्या एका साथीदारासह नातेवाईकांच्या मासीकसाठी मोहा येथे जात होते. परंतू त्यांची मोटरसायकल तडवळा चौकात तहसीलदार गणेश माळी व त्यांच्या पथकाने अाडवली. डबलसीट असल्यामुळे त्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात आला. या संदर्भात प्रभाकर निपाणीकर यांनी सध्या आिर्थक स्थिती चांगली नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना दंड करू नये, अशी मागणी केली. यावर पथकाने दंड भरा व मगच जावा असे म्हणून आडविले. तर निपाणीकर यांनी पैसेच नसल्यामुळे दंड कोठून भरणार असा प्रश्न उपस्थित केला. सदर प्रकार पाऊणतास चालला. याचवेळी शिवसेनेचे अामदार कैलास पाटील येथून जात असताना त्यांना निपाणीकर यांनी झालेला प्रकार सांगितला. अामदार कैलास पाटील यांनी निपाणीकर यांना ५०० रुपये देऊन दंड भरा व जावा, असे सांगितले. झालेल्या प्रकाराची तडवळा व परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
आर्थिक स्थिती बेताची
सध्या ग्रामीण भागात कोरोना व नैसर्गीक अापत्तीमुळे सर्व सामान्य शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती बेताची झाली आहे. त्यात पुन्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांची माहिती ग्रामीण भागापर्यंत न आल्याने अनेकांना   मोटारसायकलवर डबल सीट जाता येत नाही, हे माहित नव्हते. त्यामुळे महसूलच्या पथकाने ग्रामीण भागातील लोकांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद व कळंब शहरात मोटारसायकलवर डबल सीट जाताना बऱ्याचदा पाहिले आहे. त्यामुळे नियमांचा आजच बाऊ करण्यात येत आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील लोकांची बाजू मांडण्यासाठी लवकरच आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे प्रभाकर निपाणीकर यांनी सांगितले. 
 
Top